सागर जगदाळे
भिगवण : अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण यांच्या वतीने आज भिगवण पोलीस स्टेशनला निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज तसेच बहुजन समाजातील महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून त्यांची बदनामी करण्याचे जे षडयंत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्री,खासदार,आमदार तसेच महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून होत आहेत.या सर्व गोष्टीचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे.तसेच निवेदनातून केंद्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाला येत्या अधिवेशनांमध्ये कायदा करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल होण्याची तरतूद करावी.
सदर सत्ताधारी पक्षाने या पद्धतीचा कायदा न केल्यास विरोधी पक्षाने त्याबाबत आवाज उठवून कायदा करण्यास भाग पाडावे अशीही मागणी करण्यात आलेली आहे.केंद्र तसेच राज्य शासन निवडणुकीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन मताचा जोगवा मागत असतात व सत्तेवर आल्यानंतर त्यांची अवहेलना करून त्यांच्या बाबत बेताल वक्तव्य करून त्यांची बदनामी करण्याचं काम अलीकडील काळामध्ये चालू आहे.
त्यामुळे महासंघाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर गोष्टीचा निषेध करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहे.तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बुमई हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालून वारंवार राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करीत आहेत, त्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला.
वालचंदनगर (तालुका. इंदापूर,जिल्हा. पुणे) येथील कुमारी अपेक्षा विजय जाधव(वय१९ वर्षे) ही तरुणी एक जून २०२२पासून बेपत्ता असून तशी बारामती शहर पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी तक्रार दाखल करूनही सहा महिने उलटूनही सदर मुलीचा तपास लागत नाही त्यामुळे सदर बेपत्ता मुलीच्या तपासासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सीआयडीमार्फत तपास करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये वालचंदनगर येथील सतरा वर्ष तरुणीवर एकतर्फी प्रेमातून खुनी हल्ला झाला असून सदर घटनेचाही मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व सदरची केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावी आणि सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी असे निवेदन देण्यात आलेले आहे. सदर निवेदन भिगवण पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी स्वीकारले.त्यांनी योग्य त्या कार्यवाहीसाठी शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप,इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर .भिगवण शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड महासंघाचे ज्येष्ठ सदस्य अशोकराव साळुंखे,भरतराव मोरे,सुभाष फलपले,विजयकुमार गायकवाड,छगन वाळके,दत्तात्रय जाधव,ॲड.कन्हैया पहाणे, हर्षवर्धन ढवळे,राहुल ढवळे,आप्पासाहेब पवार,प्रशांत ढवळे,विशाल धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते