पुणे : सावत्र आईची हत्या करून तब्बल २३ दिवसांपासून चकवा देणाऱ्या मुलाला भोर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.
शिवम अंकुश शिंदे (वय-२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रेश्मा अंकुश शिंदे असे खून झालेल्या सावत्र आईचे नाव आहे. याप्रकरणी मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा (वय-१८) यांनी भोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम शिंदे याच्या आईच्या निधनानंतर वडील अंकुश यांनी रेश्मा यांच्याबरोबर विवाह केला होता. अंकुश हे कुटुंबासोबत भोर येथे राहत होते. तर आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज येथे राहत होता.
दरम्यान, आरोपी शिवम शिंदे याला वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनात होता. या रागातून आरोपी हत्येच्या दिवशी भोर येथे आला. वडील अंकुश रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत पहाटे सावत्र आई रेश्मा ह्यांची त्याने झोपेत असताना गळा चिरून आणि नंतर दगडी वरवंटा डोक्यात घालून निर्घृन हत्या केली होती. आणि खुनानंतर आरोपी शिवमने घरातून फरार झाला. खून झाला त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या. याप्रकरणी मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार हत्येप्रकरणी भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोर पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर होते.
आरोपी शिवम शिंदे हा कोल्हापूर, आंध्रप्रदेश,तिरुपती, तेलंगणा, ओडिसा, मुंबई, मध्यप्रदेश, हरियाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिला होता. गेल्या 23 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमधील एका मिठाईच्या दुकानात पार्सल पोहचवण्याचे काम करीत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, विकास लगस, अजय साळुंखे, दत्तात्रय खेंगरे, चेतन पाटील, अमोल शेडगे आणि बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.