सांगोला, (सोलापूर) : डाळिंबाच्या बागेला फवारणी करताना साडीचा पदर ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये अडकला. त्यामुळे गळफास बसल्याने एका २९ वर्षीय महिलेचा पतीदेखत जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे रविवारी (ता. २९) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
प्रियांका प्रवीण येलपले (वय २९ वर्ष, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे. डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली होती, पण गळफास इतका घट्ट बसला होता की, काही मिनिटात पत्नी जागेवरच गतप्राण झाली. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या.
प्रवीण येलपले हे पुढे पाहत ट्रॅक्टर चालवत होते. डाळिंबाच्या रोपांना औषध सोडताना अचानकपणे ट्रॅक्टर जाम झाले. पत्नीचा साडीचा पदर अडकून पत्नी प्रियांका तडफडत होती. गळफास घट्ट बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील आले नव्हते.
दरम्यान, प्रवीण यांनी ताबडतोब ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरिता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.