Solapur Crime सोलापूर : नवरा बायकोच्या भांडणाच्या कारणावरून जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्वनगर परिसरात ही घटना गुरुवारी (ता. ०४) सायंकाळी उघडकीस आली आहे.
ज्योती सुहास चव्हाण (वय २७) असे महिलेचे नाव आहे. तर अथर्व सुहास चव्हाण (वय साडेतीन वर्ष) आणि आर्या सुहास चव्हाण (वय २ वर्ष) अशी दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या घटनेने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
मयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात लिपिक या पदावर काम करतात. त्यांच्यात आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणातून नेहमी वाद होत होते. शाळेला सुट्टी असल्याने अथर्व आणि आर्या हे दोघेही घरीच होते. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दोन्ही लेकरं टीव्ही पाहण्यात दंग होते.
ज्योतीने टीव्हीचा आवाज आणखी वाढविला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचं तोंड दाबलं. यामुळे श्वास गुदमरुन मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्योती यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.
दरम्यान, सायंकाळी पाच नंतर पोलिसांना याबाबतची खबर मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्योती यांच्यासह अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मयत ज्योती ही पती सुहास यांच्यावर संशय घेत होती. या कारणातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. यातूनच ज्योती यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सुहास यांनी पोलिसांना सांगितले
दरम्यान, घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी सुहास चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्रीपर्यंत उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.