Solapur Crime| बार्शी : २२ पोती ओला सुंगधी चंदन घेऊन निघालेला टेम्पोसहित दोन चंदन तस्करांना बार्शी शहर पोलिसांनी शहरातील पोस्ट चौकातून सोमवारी (ता. १०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख ९७ हजार २०० रुपयांचे चंदन पकडले आहे.
परवेज बशीर सय्यद (वय ४४, रा. अन्वर कॉलनी, कागेकोडमेगे, भद्रावती, तालुका भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि नितीन गोरख राऊत (वय ४३, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अंकूश जाधव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस शहरात रात्री गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना शहरात पोस्ट चौकातून एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पोतून दोघेजण चंदनाची तस्करी करणार आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून टेम्पो (एम. एच. ४५/ ए.एफ. १३४१) अडविला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये २२ पोती चंदन आढळून आले. यापैकी तीन पोत्यांमध्ये ४३.५०० किलो चंदनाचे मोठे तुकडे तर इतर १८ पोत्यांमध्ये २२०.४०० किलो ओला सुगंधीत चंदनाचे लहान तुकडे केलेला आढळला.
दरम्यान, पोलिसांनी टेम्पो व चंदनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. व दोघांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखालीय सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!