सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुकर घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे.हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे या निर्दयी मुलाचे नाव आहे. त्याच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मुलगा आई विजयालक्ष्मी सिंचणसुरे यांचा सांभाळ करत होता.मात्र सांभाळ करत असताना आई पेन्शनचे पैसे इतर मुलांवर खर्च करते या रागातून त्याने डोक्यात कुकर घालून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे.अमित सुरेश धुपद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान हल्ला करणारा मुलगा हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला. आता त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा क्रूर घटनेने सोलापूर जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हल्ला करणाऱ्या मुलावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे