पुणे : आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत कृषी पंप चोरून धुमाकूळ घालणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १७ कृषिपंप जप्त केले आहेत.
अख्तर उर्फ कुल हुसेन खान (वय-२७), पांडुरग शिवाजी बोडरे (वय -२०, रा. रावडेवाडी ता. शिरूर ) कुलदिप उर्फ मोन्या बबन बोडरे (वय-२०)आणि अजर हुसेन खान वय -२२, दोघेही रा. जिल्हा नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाबाद गाव शिवारातच कृषी पंपाच्या चोरीच्या घटना वाढत होत्या. मात्र, एकाच रात्रीतून ८ कृषी पंप चोरीला गेल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. तपास करीत असताना पोलिसांना स्थानिकाच्या मदतीनेच ह्या चोरीच्या घटना होत असल्याचा संशय आला. पोलिसांनी सदर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून वरील चार आरोपींना अटक केली आहे. वरील चारही आरोपींनी आतापर्यंत १७ कृषीपंपाची चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.
दरम्यान, आरोपी अख्तर उर्फ कुल हुसेन खान याचे अहमदाबाद फाटा (शिरूर) येथे भंगाराचा व्यवसाय होता. आरोपी वरील तीन साथीदारांच्या मदतीने कृषी पंपाची चोरी करायची आणि भंगारात मिळेल त्या किंमतीमध्ये विक्री करण्याचा धंदाच सुरु केला होता. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.