Shirur News : पाबळ : शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडी येथे नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने एका कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पथकाने ही कंपनी सील केली आहे. दुर्गम भागातील शेतात पत्र्याची शेड व पत्र्याचे कंपाउंड मारून, येथे फिनेल बनवत असल्याचे भासवून चक्क अल्प्राझोलम ड्रग्ज बनवले जात असल्याची माहिती अधिक तपासात उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नार्कोटिक्स विभागाची कारवाई
मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. (Shirur News) ही करावाई गोपनीयरित्या करण्यात आली. तब्बल ३० तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु होती. या कारवाईने पोलीस देखील चक्रावले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आले आहे.
दरम्यान, मिडगुलवाडी येथील या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याची माहिती ग्रामस्थांना होती. ही कंपनी शहरापासून दूरवर असल्याने येथील गैरकारभाराची कल्पना कोणालाही नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील करण्यात आले आहे. (Shirur News ) या कारवाईत शेकडो लीटर केमिकल ओतून टाकत, काही साहित्य जाळून नष्ट केले. तर त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयांमध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून, शेडच्या परिसरात उग्र वास येत आहे. या कारवाईमुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे?
कुप्रसिद्ध ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातीन फरार झाल्यानंतर, पोलिसांनी ड्रग्ज अड्ड्यांवर छापे घालण्यास सुरवात केली आहे. (Shirur News ) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केल्याने, या घटनेशी ललित पाटील प्रकरणाचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मिडगुलवाडीच्या शेजारी अनेक पत्रा शेड
मिडगुलवाडी (ता. शिरुर) नजीक कान्हूर मेसाई, हिवरे कुंभार, खैरेवाडी येथील अनेक ठिकाणी दुर्गम भागात कुदळवाडी भागातील अनेक व्यवसायिकांनी जागा खरेदी करत मोठमोठ्या पत्रा शेड मारुन व्यवसाय उभारले आहेत. त्याबाबत देखील आता शंका उपस्थित केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : एटीएम मधून पैसे काढून वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसविणारा आरोपी गजाआड;
Shirur News : टाकळी हाजीत वारंवार वीजपुरवठा खंडित; अनुभवी वायरमन देण्याची ग्रामस्थांची मागणी