पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत मटण पार्टी करणं पुणे पोलिसांच्या चांगलच अंगलट आलं आहे . याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह चार पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे .त्यानंतर आता गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना वाटेत ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गजा मारणे याचा अत्यंत विश्वासू आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा राईट हॅन्ड अशी ओळख असलेल्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या गजा मारणेला पांड्याने पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. विशेष न्यायालयाने पांड्याला पाच दिवसांची ‘मकोका’ कोठडी सुनावली.
पांड्या मोहिते हा गजा मारणे टोळीचा पोलिसांच्या नोंदीवरील सदस्य आहे. सातारा, सांगली परिसरात मारणे टोळीचे वर्चस्व व दहशत कायम राहावी, यासाठी त्याने पंधरा-वीस साथीदारांसमवेत दुचाकी व चारचाकी वाहनांतून गजा मारणेला पुण्यातून सांगली कारागृहात नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग केला. त्यानंतर सांगली कारागृहापर्यंत जाऊन पांड्या मोहिते व इतर आरोपींनी मारणेला पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू दिल्या.