Rajgad Fort News : वेल्हे, (पुणे) : किल्ले राजगड पाहण्यासाठी किल्ल्यावर थांबलेल्या एका पर्यटकाचा पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
अजय मोहन कल्लामपारा (वय – ३३ रा. भिवंडी, ठाणे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत होता. याप्रकरणी सागर किसन माने (रा. वाशिंद ,शहापूर ठाणे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
एका पर्यटकाचा पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”अजय कल्लामपारासह पाच जणांचा ग्रुप शनिवारी (ता. १२) रोजी किल्ले राजगड पाहण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजता गडावर पोहचल्यानंतर किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने आम्ही सर्वजण येथील पद्मावती मंदिरात मुक्कामासाठी थांबलो. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सागर माने यांना जाग आली असता शेजारी झोपलेला अजय कल्लामपारा हा शेजारी नसल्याचे आढळून आले.
यावेळी सर्वांनी मंदिराच्या बाहेर शोधा शोध केली परंतु किल्ल्यावरती असणाऱ्या दाट धुक्यामुळे तो आढळून आला नाही. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाक्याजवळ अजयची चप्पल, पाण्याची बाटली व टॉर्च आढळून आली. दरम्यान जवळपास असलेल्या पर्यटकांना बोलवून पाण्याच्या टाक्यांमध्ये शोध घेतला असता अजय मृत अवस्थेत आढळला. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.