नाशिक : अत्यंत कडक सुरक्षा भेदून थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीतील चंदनाच्या झाडाची चार खोडे चोरट्यांनी बुंध्यापासून कापून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेकडो पोलीस कर्मचार्यांच्या पहार्यातून, कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता पोलिसांनाच आव्हान देणार्या या घटनेमुळे पोलिस यंत्रणेचेच वाभाडे निघाले आहे.
या घटनांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ सुरू झाल्याचे चिन्ह आहे. त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (एमपीए) परिसरातून गेल्या तीन महिन्यांत दुसर्यांदा पोलिसांनाच आव्हान देत चंदन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी ही घटना घडली.
सलग दुसर्यांदा अकादमीतून चंदनाच्या झाडांची चोरी होणे आणि त्याचा मागमूस कुणालाही न लागणे, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या फेब्रुवारीत विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची सुरक्षा भेदून चंदनाची झाडे चोरण्यात आली होती. यानंतर पाथर्डी फाट्यावरील फार्महाऊसमध्ये चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला होता.
अकादमीतील मेसजवळच्या पश्चिम बाजूला विहिरीनजिक असलेल्या चंदनाच्या झाडांचा बुंधा कापून नेण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नागनाथ दयानंद काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनाचे झाड बुंध्यापासून कापलेले व जमिनीवर पडलेले असे एकूण 17 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाची खोडे अज्ञात चोरट्याने बुधवार (दि. 27) ते गुरुवार (दि.28) दरम्यान मध्यरात्री चोरून नेले असे तक्रारीत म्हटलं आहे.