पुणे : केलवडे (ता. भोर) येथे रेशनकार्डाच्या वादातून परस्परविरोधी झालेल्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दंडासह शिक्षा ठोठाविली आहे. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिला असून या प्रकरणातून एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित कोंडे यांचे वडील नारायण कोंडे हे हॉटेल रोहित येथे १८ मार्च २०१५ ला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बसले होते. तेव्हा आरोपी आप्पा बागल याने दारूच्या नशेत वडिलांना कानाखाली मारली.
याचा जाब विचारण्यासाठी आप्पा बागल यांच्या घरी गेलो असता, आप्पा बागल आणि संतोष बागल यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आरोपी अमित कोंडे तलवारी सारख्या हत्याऱ्याने गळ्यावर वार केले. याप्रकरणी अमित कोंडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आप्पासाहेब बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आप्पासाहेब बागल हे केलवडे येथे थांबले होते. तेव्हा आप्पासाहेब बागल आणि आरोपी अमित कोंडे यांचे वडील नारायण कोंडे यांच्यात रेशनकार्डाच्या वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी अमित कोंडे याने फोनवरून शिवीगाळ केली.
आणि आरोपीने घरी येऊन आप्पासाहेब बागल यांच्या लाकडी दंडुक्याने मारहाण केली. याप्रकरणी आप्पासाहेब बागल यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, दोन्ही आरोपींच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या पी. पी. जाधव यांच्या खंडपीठात सुरु होता. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दंडासह शिक्षा ठोठाविली आहे. आरोपी संतोष बबन बागल याला सहा महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद व संतोष बागल यास भादवि कलम ३२४ अंतर्गत सहा महिने शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच आर्म ॲक्ट ४.२५ अंतर्गत एक वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
तर अमित नारायण कोंडे (वय ३१ रा. केळवडे ता भोर जि पुणे) याला १ एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठाविली आहे. तर अप्पासाहेब बबन बागल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
खटला चालविण्यासाठी सरकारी वकील किरण साळवी आणि सरकारी वकील सुनील मोरे यांना राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक एस बी साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगळ, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, बी बी कदम, पोलीस अंमलदार मंगेश कुंभार यांनी साहाय्य केले.