Pune Police News पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमधून निदर्शनास आले. (Pune Police News) एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी दर्शना पवारच्या हत्येनंतर काही दिवसांत पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात तरुणीवर भरदिवसा कोयता हल्ला झाला. (Pune Police News)
या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आता पुणे शहर पोलिसांकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले आहे. त्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोकोका लावला जात आहे. पोलिसांनी दीड हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये ११५ जणांना अटक केली आहे. तसेच १८२४ गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी ५७७ गुन्हेगार असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावर विविध कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले.
दरम्यान, शहरातील कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर प्रत्येक पोलीस चौकीत २४ तास पोलीस असणार आहेत. पुणे शहरात १११ पोलीस चौकी आहेत. त्या २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयातील तरुणांकडे कोयता असल्याचे दिसून आले. मग एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींना धमक्या दिल्या जात आहे. पेरुगेटजवळ तरुणीवर झालेला हल्ला तसाच होता. त्यामुळे पोलिसांनी आता शाळा अन् महाविद्यालयात तक्रार बॉक्स ठेवले आहे. या तक्रार बॉक्समध्ये तक्रार देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे.