Pune News : रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने पती-पत्नी दिवा लावून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दिव्याने पेट घेतला. आग झपाट्याने घरभर पसरली. या आगीत धुरामुळे गुदमरून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी भागात ही घटना घडली आहे. वृद्ध दांपत्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.(Pune News)
आगीत धुरामुळे गुदमरून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू .
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मारुती भाऊ साबळे (वय ८३) व पुताबाई मारुती साबळे (वय ७३) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Pune News)
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील साबळेवाडी या छोट्या वस्तीमध्ये आदर्श पुरस्कार विजेते मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला आणि दोघेही झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास दिव्याने अचानक पेट घेतला. यामध्ये घरातील टेबल जळून खाक झाला. हळूहळू आग घरभर पसरली.(Pune News)
दरम्यान, आग वाढल्यामुळे दोघांनाही जाग आली. घरातील वणवा विझवण्यासाठी त्यांनी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्यामुळे दोघांचा श्वास गुदमरला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वृद्ध दांपत्याच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.