Pune News : पुणे : बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पिस्तूल हाताळत असताना त्यामधून चुकून झाडल्या गेलेल्या गोळीमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल
ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. अभय छबन वाईकर (वय २२, रा. सांगरून, ता. हवेली), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, सांगरून, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद घोलप यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वाईकर आणि मोन्या हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत आणि ते एकाच गावात राहण्यास आहेत. वाईकर याने दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीरता एक पिस्तूल खरेदी केलेले होते. हे पिस्तूल त्याने मोन्या याच्याकडे हाताळण्याकरता दिले होते. मोन्या याने ते बेदरकारपणे व हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यामधून अचानक गोळी झाडली गेली. ही गोळी अविष्कारच्या मानेला लागली आणि तो गंभीर जखमी झाला.
त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एका खासगी रुग्णालयातून पोलीस हवालदार आनंद घोलप यांना माहिती मिळाली की, एक तरुण पिस्तूलची गोळी लागून गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यानूसार पोलीसांनी रुग्णालयात धाव घेतली असता अभय वाईकर हा दाखल झाल्याची माहिती मिळाली.
त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले अविष्कार धनवडे, अनंता धायगुडे, सोमनाथ मानकर, मंगेश मानकर आणि अभय वाईकर घरासमोरील दहीहंडी कार्यक्रम पहात एका झाडाखाली थांबले होते. तेव्हा अभय वाईकरने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून अविष्कारला दाखवले. अविष्कारने पिस्तूल हातात घेऊन ट्रीगर प्रेस केला असता, त्यातून गोळी सुटली.
दरम्यान, अभय याच्या गळ्याच्या उजव्या बाजूला गोळी लागल्याने तो खाली कोसळला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तूल हस्तगत केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.