Pune News : लोणीकंद, (पुणे) : पुणे शहराच्या पूर्व भागातील तुळापूर परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या कथित ‘रेव्ह पार्टी’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. आळंदी-मरकळ रस्त्यालगत असलेल्या एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या या पार्टीत उपस्थित असलेल्या सुमारे ६० ते ७० तरुण-तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, नशेसाठी वापरले जाणारे काही संशयित पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Pune News

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत मोठ्या आवाजातील संगीत, मद्यपान आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या धांगडधिंग्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला. संबंधित बंगला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून, कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी सुरू आहे. Pune News

कारवाईदरम्यान काही युवक-युवती मद्यधुंद अवस्थेत आढळल्याचे समजते. तसेच, पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या संशयित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. Pune News

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात आयटी तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत कार्यरत उच्चशिक्षित तरुण-तरुणी सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. आयोजक, बंगल्याचे मालक, कार्यक्रम व्यवस्थापक आणि उपस्थित व्यक्तींची चौकशी सुरू असून, प्रवेश शुल्क, आर्थिक व्यवहार आणि परवानग्यांचाही तपास केला जात आहे. Pune News
शहरातील पब, क्लब आणि हॉटेल्सवर नियमभंगाविरोधात कठोर कारवाई सुरू असताना अशा प्रकारचे कार्यक्रम उपनगरांमध्ये आणि पुणे ग्रामीणच्या सीमावर्ती भागांत आयोजित केले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कार्यक्रमांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Pune News
दरम्यान, या प्रकरणी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. Pune News







