Leopard attack | राजगुरूनगर : या परिसरात सातत्याने बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तिन्हेवाडी (सांडभोरवाडी, ता. खेड) येथे शेतात पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी शिवाजीराव गेनु सांडभोर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर, कानाला बिबट्याने नख्यांनी ओरबाडले असुन हाताला चावा घेतला आहे.
रविवारी (दि. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पुणे-नाशिक जुना महामार्ग लगत इंदिरा पाझर तलावाजवळ जखमी सांडभोर यांची वस्ती आहे. घरापासून जवळच पण डोंगराच्या कुशीत आसलेल्या शेतात ते एकटेच पाणी भरायला गेले होते. मोटार सुरु करून पाणी आल्याबरोबर त्या आवाजाने शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेत हल्ला केला.
सांडभोर यांनी जवळच्या फावड्याने प्रतिकार केल्याने बिबट्या डोंगराकडे पळाला व अनर्थ टळला. जखमी सांडभोर यांना कुटुंबातील व्यक्तीनी ग्रामस्थांनी उपचारासाठी राजगुरुनगर येथे तातडीने दाखल केले.
दरम्यान सरपंच अरूण थीगळे, माजी सरपंच बाळासाहेब सांडभोर, सदस्य संतोष पाचारणे, बी. डी. सांडभोर आदींनी वनविभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली तसेच जखमी सांडभोर यांना उपचारासाठी मदतकार्य केले. वन रक्षक एस के ढोले , वन सेवक प्रकाश सांडभोर यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..