पुणे : शेजारी राहणाऱ्या महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीकडून ८ लाख ३९ हजार ४०० रुपयांची खंडणी उकळली. यानंतर पुन्हा १० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी पती-पत्नीसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला.
याबाबत गणेश चंद्रकांत माने (वय 38 रा. आंबेगाव खु, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महिला, तिचा पती व दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संबंधित महिलेने सुद्धा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून, त्यांनी पुण्यात फ्लॅट घेतला आहे. त्याच्या फ्लॅटच्या समोरच आरोपी महिला राहते. तिने स्वत:हून फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवून घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवल्याने शारीरिक संबंध झाले. त्यावेळी महिलेने शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो फिर्यादी यांना काढायला सांगितले. यानंतर आरोपी महिलेने फिर्य़ादी यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर घरच्यांना सांगण्याची धमकी दिली.
प्रकरण मिटवण्याचा बहाणा करत खंडणी..
महिलेचा दाजी तेजेंद्र त्रिपाठी याने प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलमधील फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तिचा पती आणि दाजी त्रिपाठी यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागितले.
…अखेर पोलिसांत धाव..
महिलेने गेल्या वर्षभरात फिर्य़ादी यांच्याकडून ८ लाख ३९ हजार रुपये उकळले. त्यानंतरही तिने आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. महिलेकडून वारंवार होत असलेली पैशांची मागणी आणि तिच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गणेश माने यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
फिर्यादीवरच बलात्काराचा गुन्हा दाखल..
आरोपी महिलेने गणेश माने यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच संबंध ठेवतानाचे फोटो काढले. हे फोटो दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ते फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गणेश माने आणि दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.