Pune News : एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका टवाळखोराने थेट मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी टवाळखोर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
टवाळखोर तरुणावर गुन्हा दाखल
आकाश महेंद्र रोचवानी (वय २४, रा. न्याती इस्टेटजवळ, इंदिरानगर, महमदवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश रोचवानी हा पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र मुलगी त्या तरुणाला प्रतिसाद देत नव्हती. म्हणून आरोपी मुलगा नेहमी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी पीडित मुलगी शिकवणीवरून घरी जात असताना मुलाने तिचा रस्ता अडवला आणि बोलण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ही गोष्ट मुलीला खटकली आणि ही बाब तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्याला या गोष्टीचा जाब विचारल्यावर, आरोपी मुलगा म्हणाला की, “माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. तर तुमच्याकडे बघून घेईल” अशी धमकी दिली.
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ याबाबत मुलावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.