Pune News : पुणे : महागड्या वस्तू स्वस्तात घेण्याचा मोह अनेकांना खुणावतो; मात्र, वस्तू हाती आल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. त्यावेळी पश्चातापाशिवाय हाती काही लागत नाही. असाच प्रकार चंदननगर येथील महिलेबाबत घडला आहे. नामांकित कंपन्यांचे कपडे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी खोक्यातून चिंध्या पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला
तीन लाख रुपयांची फसवणूक
याबाबत एका चंदननगर येथीन महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कपडे विक्रीचा व्यवसाय करते. चोरट्यांनी पाळत ठेवून, महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवला.
महिलेशी संपर्क साधून, तिच्याशी गोड बोलून, विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्याकडे नामांकित कंपन्यांचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बतावणी महिलेसमोर केली. हे कपडे स्वस्तात देण्याचे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. बाजारभावापेक्षा कमी किमतीत कपडे मिळत असल्याने, महिलेने ऑनलाइन व्यवहार करून, तीन लाख रुपये पाठविले.
दरम्यान, चोरट्याने कपडे खोक्यात घालून पाठवून देत आहे, असे सांगत खोक्यांमध्ये चिंध्या भरून महिलेच्या घरी पाठवल्या. महिलेने खोके उघडले असता, खोक्यात कपड्यांऐवजी चिंध्या असल्याचे आढळून आले. फसणुकीच्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने चंदननगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.