Pune News : पुणे : राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार अनेक गुन्हे दाखल होत असतानाच एक खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. आईची साडी चोरुन साडीच्या बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबू, भेळ, भात, काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती, कापूर असे पदार्थ ठेवले. प्रॉपर्टीच्या कारणावरुन हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. यात सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनवाडी येथे ११ व १३ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी जनवाडी येथे राहणाऱ्या एका २८ वर्षांच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता सुरेश चव्हाण (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघे रा. जनवाडी), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्निल सुपेकर (वय २३), सोनल प्रविण सुपेकर (वय ३०), देवऋषी स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) फिर्यादी व त्यांची आजी कांता चव्हाण या शेजारी शेजारी रहातात. फिर्यादीच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. सावत्र आई कोथरुडमध्ये राहते.
दरम्यान, फिर्यादीच्या आईची साडी घराबाहेर वाळत घातली होती. ही साडी चोरीला गेल्याचे कळले. सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर त्यांची आजी व तिच्याकडे भाड्याने राहणार्या मुलीनेच साडी चोरुल्याचे दिसले. १३ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे शेजारील आजीच्या घरात गेले. (Pune News) त्यावेळी त्यांना धक्कादायक प्रकार दिसला. आई, मावशी, काकू यांचे फोटो ठेवून त्यांच्या फोटोला व आईच्या साडीच्या बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबू, भेळ, भात, काळीज, मटण, हळद-कुंकु, अगरबत्ती, कापूर असे पदार्थ ठेवले होते. तर देवऋर्षी मंत्रोच्चार करीत होते.
दरम्यान, फिर्यादीने माझ्या आईची साडी घेऊन काय करता, असे विचारले. तेव्हा आजी कांता चव्हाण हिने तुम्हाला भिकेला लावले, आमची प्रॉपर्टी घेतली. आम्ही तुमच्यावर करणी करुन तुम्हाला मारुन टाकणार, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबामध्ये भितीचे वातावरण आहे. (Pune News) पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : माणुसकीला काळीमा! सख्ख्या मोठ्या भावाकडून लैंगिक अत्याचार; बहिणीने दिला बाळाला जन्म