Pune News : पुणे : कमी किंमतीचे हिर्याचे दागिने जास्त किंमतीला देऊन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका महिलेची तब्बल ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केल्याची घटना एका नामांकित शोरूममध्ये घडली आहे. लक्ष्मी रोडवरील उंबर्या गणपती चौकातील तनिष्कच्या शोरुममध्ये हि घटना घडली आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे. त्यानुसार शोरूमच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सेल्समनला अटक करण्यात आली आहे.
संगिता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल महेता, शोरूमचे मालक हितेश पुनामिया अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चेतन विसपुते याला अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर येथील एका ४६ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पेट्रोल पंप व इतर व्यवसाय आहेत. त्यातून मिळणार्या पैशांमधून त्यांनी डिसेबर २०१८ पासून तनिष्कच्या लक्ष्मी रोडवरील शोरुममधून वेळोवेळी ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्यांचे दागिने खरेदी केले होते. यावेळी त्या नेहमीच्या ग्राहक असल्याने त्यांनी डिस्काऊंट मागितल्यावर तेथील मॅनेजर, कॅशिअर यांनी त्यांना डिस्काऊंट दिला होता.
जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी हे हिर्याचे दागिने बदलून दुसरे दागिने घेण्यासाठी शोरुममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून दागिने न बदलण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी फोन केले. तरी त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
तेव्हा त्यांनी तनिष्कच्या दुसर्या शो रुममध्ये हे हिर्याचे दागिने दाखविले. तेव्हा त्या शो रुममधून त्यांच्याकडील हिर्याचे दागिने हे प्रत्यक्षात अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना कमी किंमतीचे हिर्याचे दागिने जास्त किंमतीत दिले. जादा रक्कमेचे बनावट बिल तयार करुन त्यावर तनिष्कचे शिक्के मारुन डिस्काऊंट दिल्याचे भासविले.
दरम्यान, अशा प्रकारे ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्याचे दागिन्यांचे वेळोवेळी बिले देऊन प्रत्यक्षात ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. शोरुममधील मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि मालक यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करुन मुख्य सेल्समनला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करीत आहेत. Pune News