Pune News : मावळ ( पुणे ) : वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीतील २ हजार ९४२ गुंठे जमिनीची परस्पर विक्री करून, शासनाची घोर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आंबवणे येथील वनपाल संजय आहिरराव यांनी मंगळवारी (ता. २१) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रफिक दाऊद रुवाला (वय ७३), आली अजगर (वय २०) यांच्यासह एका महिलेवर (सर्व रा. नेरूळ रोड, ठाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत काही क्षेत्र खासगी वन संपादन अधिनियम १०७५ अंतर्गत येते. त्या जमिनीची विक्री करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, आरोपींनी मोठ्या शिताफीने या जमिनीतील दोन हजार ९४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे बनावट पत्र वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाने तयार केले. त्या पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे तीन वेगवेगळे दस्त करून वन विभागाचे क्षेत्र बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले.
दरम्यान, फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.