पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात खून,अत्याचार,हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच पिंपरी चिंचवड भागातील चिखली परिसरात एका 37वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या व्यक्तीची हत्या तीन अल्पवयीन मुलांनीच सिगारेट आणि माचीस न दिल्याच्या रागातून केली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महेश शिवाजी चामे (वय ३७ )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती लातूर येथील असून सध्या चिखलीमधील नवचैतन्य सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे.ते चिखली भागात रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात. शारदानगर भागात (8 मे ) गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास महेश याचा मृतदेह सापडला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरु होता. मात्र अवघ्या काही तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.व्यसनाच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांनी महेश यांच्याकडे सिगारेट आणि माचिस मागितली होती. मात्र ती दिली नाही म्हणून त्यांनी महेश याचा कोयत्याने वार करून खून केला. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपी हे मोरेवस्ती, मोरया कॉलनी येथील न्यू गोल्डन बेकरीच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये बसले असता सापळा रचून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत आरोपीनी वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.