Pune Fraud News : पुणे : पोलिस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ व्यक्तीचे हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शिंगवे पारगाव – रस्त्यावर गुरुवारी (ता. ०५) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
गुन्हा दाखल
विश्वनाथ निवृत्ती उंडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यानी दिलेल्या तक्रारीनुसार पारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता उंडे हे त्यांचा मित्र पोपट उंडे याला घेऊन दुचाकीवर पारगाव येथून भागडी येथे जात असताना शिंगवे गावच्या हद्दीत धनगरवस्ती येथे दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबवले, आम्ही पोलिस आहोत, या ठिकाणी चरस, गांजाच्या केस झाल्या असून, आम्ही सर्वांना चेक करत आहोत, असे म्हणत ओळखपत्र दाखवून या ठिकाणी आम्ही सर्वांना चेक करत आहोत, असे म्हणाले.
त्यावेळी त्या दोघांनी फिर्यादीला त्याच्या खिशातील रुमाल काढायला सांगितला. फिर्यादीने रुमाल त्यांच्याकडे दिला असता त्यांनी तुमच्या जवळील सर्व चीज वस्तू त्या रुमालात ठेवा, असे म्हणत उंडे यांच्या जवळील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, रोख रक्कम रुमालात ठेवून त्याची गाठ बांधून फिर्यादीचे बॅगेत ठेवली व ते निघून गेले.
फिर्यादी यांनी घरी जाऊन पाहिले असता रुमालात फक्त रोख रक्कम होती. चेन व अंगठी मिळून आली नाही. याबाबत त्या दोन अज्ञात व्यक्तींनी हातचलाखी करत फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.