Pune Crime : उरुळी कांचन, (पुणे) : जेजुरीत खंडोबाच्या दर्शनाला येवून दुपारच्या वेळेस घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
राहुल हिरामण लष्करे (वय- २२ रा. काळा खडक, वाकड, ता. हवेली) व अजय एकनाथ चव्हाण (वय २२ रा. जांभळी बु. ता. भोर जि. पुणे, मुळ रा. खांडवी ता. गेवराई जि बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजूरी-सासवड परीसरात दिवसा घरफोडी, चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हयांमध्ये दुपारच्या वेळेस बंद घरांची कडी-कोयंडा तोडून घरफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार घरफोडी चोरीचे गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरू केला असता एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा राहुल लष्करे व याने केले असून तो नसरापुर फाटा परीसरात येणार आहे.
सदर पथकाने राहुल लष्करे व अजय चव्हाण यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जेजूरीला खंडोबाचे दर्शनासाठी आल्यानंतर वाल्हे व सासवड शहरात सोसायटीतील बंद घरांची कडी कोयंडा तोडून चोरी केली असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी राहुल हिरामण लष्करे हा सराईत असून त्याच्यावर पुणे शहर हद्दीत यापुर्वी पाच गुन्हे दाखल असून तो नव नवीन साथीदाराला घेवून चोरी करत असल्याची तपासात उघड होत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, प्राण येवले यांनी केली असून आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास जेजूरी पोलीस करत आहेत.