ठाणे : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात अटकेपासून बचाव करण्यासाठी निजामपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने 29 हजार रुपये लाच स्वीकारली असल्याची माहिती समोर आली. पोलीस कर्मचाऱ्याने 29 हजार रुपये लाच स्वीकारली खरी परंतु त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना पाहताच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याने उप अधीक्षकांना धक्का देऊन लाचेच्या रक्कमेसह धूम ठोकली. याप्रकरणी ठाणे एसीबीने पोलीस कर्मचारी निळकंठ सुभाषराव खडके याच्यावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निळकंठ खडके निजामपुरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर आयपीसीनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा पोलीस कर्मचारी निळकंठ सुभाषराव खडके तपास यांच्याकडे होता. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी खडके याने तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ठाणे एसीबीकडे सोमवारी (दि.10) पोलीस नाईक निळकंठ खडके लाच मागत असल्याची तक्रार दाखल केली.
एसीबीच्या पथकाने चौकशी केली असता, पोलीस नाईक खडके याने तक्रारदारकडे दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आपण मदत करतो म्हणून 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 29 हजार रुपये स्वीकारण्यास खडके सहमत झाले. त्यानुसार मंगळवारी निजामपुरा पोलीस ठाण्यात सापळा रचला गेला. खडके याने शासकीय दुचाकीवर तक्रारदार यांना बसवून आदर्श पार्क जवळ नेऊन 29 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर खडके पोलीस ठाण्यात गेला.
परंतु निजामपुरा पोलीस ठाण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाला पाहताच खडके याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक विशाल जाधव यांनी खडके याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडके याने जाधव यांना धक्का देऊन लाचेच्या रकमेसह धूम ठोकली. खडके याने धक्का दिल्याने पोलीस उप अधीक्षक जखमी झाले आहेत. एसीबीच्या पथकाकडून लाचखोर निळकंठ खडके याचा शोध सुरु करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबीच्या पथकाने केली आहे.