संभाजीनगर (औरंगाबाद) : येथील वाळूज भागात तीन महिन्यापासून बंद असलेल्या घरात मिठात पुरलेला सांगाडा सापडल्याने एकाच खळबळ उडाली होती. पोलिसांनी नक्की काय प्रकार आहे, यासाठी चौकशी करताना फरार भाडेकरूला ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या खुलाशाने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज येथील समता कॉलनीमध्ये भाड्याने राहणारे काकासाहेब भुईगड यांच्या बंद खोलीत मिठात पुरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तो महिलेचा असल्याचे उत्तरीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना तेथे राहणाऱ्या काकासाहेब भुईगड याला पंढरपूर परिसरातून ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.
चौकशीत तो पुरलेला मृतदेह आपल्याच आजारी पत्नीचा असल्याचे काकासाहेब भुईगड याने सांगितले. त्याची पत्नी ही मृत्यूपूर्वी प्रचंड आजारी होती. तिने दीड महिन्यापूर्वी अन्नत्याग केला होता त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने अनिताचा मृतदेह घरातच मीठ टाकून पुरला असल्याचे काकासाहेब भुईगड याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून त्याचा अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. मृतदेहाच्या अंगावर कोणतेही जखमांचे निशाण नसल्याची माहिती समोर आली आहे. काकासाहेब भुईगडने सांगितलेली माहिती खरी कि खोटी यावर पोलीस सर्व दिशेने तपास करत असून सध्या मात्र वाळूज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.