Pimpari News : पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड मधील चिखली भागात हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. या मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे.
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहे. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात एक कुटुंब वास्तव्याला होते. आग लागल्यानंतर ते दुकानातून बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून या आगीत आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ज्यावेळी आग लागली त्यावेळी परिसरात राहणाऱ्या काही लोकांच्या ही बाब लक्षात आल्याने ही घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाकडून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.