Nagar News अहमदनगर : शहरातील टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून 30 हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन दोघे फरार झाले होते. या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी दोन दिवसांत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nagar News)
गणेश गुलाब बडदे (वय २५ वर्षे, राहणार इंगळेमळा सारसनगर, अहमदनगर), सुमेध किशोर साळवे (वय २५ वर्षे गौतमनगर, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) अशी दोघा आरोपींची नावे आहे. फिर्यादी स्वप्नील रावसाहेब गंगावणे (वय १८ वर्षे, रा कवडाणे ता.कर्जत जि. अहमदनगर) हे गुरुवारी रात्री एक वाजता टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयासमोरुन टेम्पो घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून गाडी फोडून तीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती. (Nagar News)
कोतवाली पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नगर-सोलापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. (Nagar News)
दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करत आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, पोलिस हेडकॉन्टेबल तनवीर शेख, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, इस्त्राईल पठाण, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nagar News)