पुणे : कुख्यात गुंड शरद मोहळ हत्या प्रकरणी पोलिसांनी १२ तासांच्या आत ८ आरोपीना अटक केली. मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मास्टरमाइंड नामदेव कानगुडे यांचा यामध्ये समावेश आहे. हत्या झाली त्याच दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. दहा वर्षापूर्वी झालेल्या जमिनीच्या वादातूनच शरद मोहोळची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
त्यानंतर या प्रकरणात पोलीस तपासात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळला संपवण्यासाठी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यांनी हत्येच्या आधी काही दिवस फायरिंगची प्रॅक्टिस केली होती. तब्बल महिनाभर आधी त्याने ही प्रॅक्टिस केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुन्ना पोळेकरने महिनाभर आधी टोळीत प्रवेश करत विश्वास संपादन केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून तो सतत शरद मोहोळसोबत होता. शेवटी लग्नाच्या वाढदिवशीच त्याने गेम केली. यासाठी तीन ते चार महिन्यांपूर्वी पिस्तुल आणल्या होत्या. तसंच गोळीबाराचा सराव भादे इथं करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पोळेकरचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. साहिल पोळेकरच्या मामाची यामध्ये मोठं नुकसान झालं होतं. मात्र शरद मोहोळच्या दहशतीमुळे त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. म्हणूनच मामावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी साहिलने हे पाऊल उचललं.
शरद मोहोळ हत्या प्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान, मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.