पुणे : नातीला जेवण न दिल्याच्या कारणाने सासूचा गळा आवळून खून करणाऱ्या सुनेला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
सुषमा अशोक मुळे (वय-७१ रा.पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय-३२)असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद सुभाष शेंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून भांडण होत होती. गुरुवारी (ता. १५ ) दुपारी सून सुवर्णा ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेजारी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचं सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये जोरदार भांडणे झाली. या रागातून सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीच्या साहाय्याने सुषमा यांचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर पती सागर मुळे घरी आला असता सासू सुषमा या चक्कर येऊन पडल्याचे सुवर्णाने सांगितले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची चाकण पोलिसांना माहिती मिळताच रुग्णालयात आले. व त्यांनी तपास सुरू केला असता चौकशीत सुवर्णाने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. तरी, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.