विशाल कदम
लोणी काळभोर : कुंजीरवाडी येथील कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली असून ही गुप्ता यांची एमपीडीए कायद्यांतर्गतची ८७ वी कारवाई आहे.
मोन्या उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ (वय २४, रा. नवीन कॅनॉल जवळ, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, लोणीकाळभोर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळ व त्याच्या साथीदारांवर कोयता, चाकू, तलवार यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
दरम्यान, कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळ याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी मोन्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
हा प्रस्ताव लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा, म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपी मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळ याला नाशिक कारागृहात १ वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे.