पुणे : प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना फुरसुंगी येथे उघडकीस आली. ही घटना मंगळवारी (ता. १३ ) रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.
आशिष मारुती धणके (वय-24 रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी मुलीची ऑक्टोबर २०२२ पासून पाठलाग करत होता. त्यानंतर फिर्यादी तरुणीने प्रेमास नकार दिल्याने आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याबदल तरुणीने आरोपीच्या पत्नीला सांगितले. त्याचाच राग आल्याने आरोपीने मंगळवारी (ता.१३) रात्री फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादी तरुणीने कोयत्याचा वार चुकल्याने ती थोडक्यात बचावली.
दरम्यान, फिर्यादी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकणी फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी आशिष मारुती धणके याच्यावर आयपीसी ३०७ , ४५०, ६२३ , ३५४ , ३५४ ड, ५०६, पॉक्सो अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.