Maval News तळेगाव दाभाडे : खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला वडगाव मावळ येथील न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांनी जामीन मंजूर केला आहे. (Maval News) या आरोपीने मैत्रिणीसोबत बोलल्याचा मनात राग धरुन कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. (Maval News)
रोहित शिवपुत्र सोनकांबळे असे यामध्ये जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. रोहित याने 6 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद रोडवर कोयत्याने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील आरोपी रोहित शिवपुत्र सोनकांबळे याने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ येथील न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने आरोपीच्या वकिलाची बाजू ऐकून घेत जामीन मंजूर केला.
आरोपीची गुन्ह्यात भूमिका नाही; वकिलाचा युक्तिवाद
फिर्यादीनुसार अर्जदार आरोपी याची या गुन्ह्यात भूमिका नाही. अर्जदार आरोपी हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. आरोपी हा 29 वर्षांचा असून, कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आरोपी अर्जदार हा सराईत गुन्हेगार नसून त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे इतर जास्त गुन्हे नाहीत. त्याचप्रमाणे जो जखमी होता त्याला कसलेही प्रकारची दुखापत झालेली नाही. आरोपीला खोट्या केसमध्ये अडकवले आहे, असा युक्तिवाद आरोपीचे वकील यांनी केला.
सशर्त जामीन मंजूर
दरम्यान, आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांच्या न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.