बार्शी : माढा – वैराग रस्त्यावर मालवंडी (ता. बार्शी) ग्रामपंचायत हद्दीत वैराग गावाकडे जाणाऱ्या एस. टी. बसचा रॉड तुटल्याने बस पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता. ०५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. एसटी बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी डेपोची एसटी बस ही कुर्डूवाडीवरून वैरागच्या दिशेने निघाली होती. यावेळी मालवंडी ग्रामपंचायत हद्दीतील भिसेवस्ती येथे उसाचे दोन ट्रॅक्टर हे वैरागकडून केवड येथील असलेल्या कारखान्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी एसटी बस चालकाने बस बाजूला घेत ट्रॅक्टरला जाण्यासाठी वाट दिली. काही अंतर पुढे जाताच एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटला.
ही गोष्ट चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ब्रेकच्या सहाय्याने गाडी हळू करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी बसचे मागील तायार घसरले व बसने महावितरणच्या खांबाला धडक दिली. धडकेने बस पलटली. या अपघातात बस आणि लोखंडी खंबाचे नुकसान झाले असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर नागरिक आक्रमक ; प्रशासनाचा गलथानपणा
मागील वर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने मालवंडीत रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आश्वासन देखील रस्त्यावर पडलेल्या खड्यात गेले. तसेच रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना दुखापत देखील झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन ढिम्म झाले आहे. राजकारण करण्यासाठी, श्रेय घेण्यासाठी पुढे येतात मात्र सोयी सुविधा पुरविण्यात मागे असतात. निवडणूक आली की ग्रामीण प्रश्न दिसतात. निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
मालवंडीचे सरपंच, नवनाथ गवळी म्हणाले की, मालवंडी – वैराग रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाला वारंवार तक्रार दिली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.