Loni Kalbhor News लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी मंगळवारी (ता. १) रात्री रोख रक्कम चोरून नेली होती. ही घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरी करून पळून जाताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. (Loni Kalbhor News)
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांची गस्त फक्त नावालाच असते का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Loni Kalbhor News)
मिळालेल्या माहितीनुसार, महेश मुकिंदा चौधरी (वय २६, रा. वडाचीवाडी, नायगाव-पेठ, ता. हवेली) यांचे सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी एक स्नॅक्स सेंटर आहे. चौधरी यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. २) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्नॅक्स सेंटर बंद केले आणि गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. (Loni Kalbhor News)
त्यानंतर महेश चौधरी यांनी स्नॅक्स सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी गल्ल्यातील १० हजार रुपयांच्या रोकडसह दुकातानील कोल्ड्रिंक्स व इतर सामान चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. महेश चौधरी यांनी सीसीटीव्हीमध्ये पहिले असता, त्यांना चार चोरटे चोरी करून दुचाकीवरून पळून जाताना निदर्शनास आले. याबाबत अद्याप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. (Loni Kalbhor News)
दरम्यान, गेल्या आठ दिवासांपूर्वी कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात तीन ठिकाणी घरफोडी झाल्या होत्या. त्यानंतर कुंजीरवाडीतच दोन दिवसांपूर्वी मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडले. या चोरीत चोरट्यांना दुकानातील फक्त चिल्लर हाती लागली होती. त्यानंतर चोरट्यांनी सोरतापवाडी स्नॅक्स सेंटर फोडून मुद्देमाल लंपास केला आहे. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर पोलिसांचे गस्त नावालाच
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हे रोखले पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. मात्र, याच परिसरात सारख्या चोऱ्या होत असल्याने लोणी काळभोर पोलिसांची गस्त फक्त नावालाच असते का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. (Loni Kalbhor News)