(Loni Kalbhor Crime) उरुळी कांचन, (पुणे) : आगामी काळात मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपून सुट्टी सुरू होईल. या उन्हाळी सुट्टीत गावी किंवा बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखत असाल तर सावधान… तुमच्या घराच्या बंद दरवाजावर चोरट्यांची कधीही नजर पडू शकते. गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून जबरी चोरीच्या घटनांची नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून एकप्रकारे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे चित्र आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोणी काळभोरसह पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ असाच काहीसा प्रकार सध्या गुन्ह्यांबाबत घडत आहे. काही तासांसाठी फेरफटका मारायला गेलेल्यांच्या तसेच दवाखान्यात गेलेल्या घरांच्या सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरातील बंद घर शनिवारी (ता. ०८) दिवसाढवळ्या सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत तुषार मधुकर जगताप (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार जगताप हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता म्हणून घरातील अन्य व्यक्ती त्यांना आणण्यासाठी म्हणून घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते. चोरट्यांनी हि संधी साधत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटा मधील ऐवज चोरुन नेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांची तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून पोलीस ठाण्याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
चोरटे पोलिसांना सापडेनात…!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी करणारे चोरटे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. यापूर्वीही उरुळी कांचन परिसरात चोरट्यांनी अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालून बऱ्याच घरफोड्या केल्या असून उरुळी कांचनला चोरट्यांनी आपली दहशत निर्माण केली आहे. एकाही चोरीचा छडा लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!