दिनेश सोनवणे
दौंड : कंपनीतील कामगाराचे हातपाय बांधून आरडाओरडा करू नये म्हणून तोंडात बोळा कोंबून अज्ञात सहा चोरट्यांनी रोहित्र तयार करण्यासाठी लागणारे ७६ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. लिंगाळी, वेताळनगर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. १७) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी कंपनीचे मालक रोहित बाळासाहेब जगदाळे (वय-२६, रा. लिंगाळी, वेताळनगर ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात सहा चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जगदाळे हे कुटुंबीयासमवेत सदर ठिकाणी राहतात. त्यांची वेताळनगर येथे साई ट्रान्सफार्मर कंपनी असून त्यामध्ये विद्युत रोहित्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बनविले जाते. या अक्षय कुमार दिनानाथ बीन (वय-२१रा. डुमर नरेद्र, भिस्वा खालसा, डी नरेद्रं जि. गोपालगंज. राज्य बिहार यास कामास ठेवले असून तो दिवसभर कंपनीत काम करून रात्रीच्या वेळी राहण्यासाठी कंपनीत असतो.
शनिवारी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास कंपनीतील सर्व कामे आटपुन जगदाळे घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास काका विनोद दिवेकर यांनी मोबाईल फोनवर फोन करून कळविले की, तुझ्या साई ट्रान्सफार्मर कंपनीत चोरी झाली असून तु तात्काळ कंपनीत ये.
मिळालेल्या माहितीनुसार जगदाळे कंपनीत आले असता काम करणारा अक्षय याने सांगितले कि, १ वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना अज्ञात सहा इसमांनी कंपनीचे टाळे तोडून कंपनीत आले. त्यातील दोघांनी जवळ येवून आरडाओरड करू नको म्हणून चाकू सारखे हत्यार दाखवून धमकावले तर दोघांनी हात व पाय वायरने बाधून तोंडात कापडाचा बोळा घातला. सहामधील ४ इसम हे २५ ते ३० वयोगटातील होते. सर्वांनी चेहरे रूमालांने बांधलेले होते.
दरम्यान, कंपनीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले तांब्याची वायर, पितळ व अल्युमिनियमचे राँड तेथून उचलून चोरून नेले. त्यानंतर एका इसमाने अक्षयचा मोबाईल फोन तसेच कंपनीचा मोबाईल फोन काढून घेवून सहा इसम तेथून निघून गेले. त्यानुसार कंपनीतील ७० किलो वजनाची तांब्याची तार, ५ हजार ५०० रुपयांचे पितळी नट, व दोन मोबाईल फोन असा ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात सहा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चौरे करीत आहेत.