Kishor Aware Murder Case | मावळ, (पुणे) : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येचा तो मुख्य सुत्रधार असल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
गौरव भानू खळदे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी खळगे याला पोलिसांनी शनिवारी (ता. १३) रात्री उशिरा अटक केली आहे. या हत्येचा तो मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा तळेगाव नगरपरिषदेसमोर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याचे २१ वार आणि ३ गोळ्या घालत निर्घृण हत्या केली. यात आवारे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आवारे यांच्या कुटुंबियांकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सुनील शेळके यांनी काल माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. आपला या हत्येशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अवघ्या काही तासांत पोलिसांनी हत्येतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. या घटनेतील आरोपींनी याची पोलिसांकडे कबुली दिल्याने मुख्य सूत्रधार सापडला आहे. गौरव खळदे हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!