Khed Crime | पुणे : पीएमपीएल विभागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पीएमपीएल बस चालकाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर पीएमपीएल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
विलास बुले (३५) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. ते खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील रहिवासी आहेत. विलास यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक विलास हे गेल्या ८ महिन्यांपुर्वीच पीएमपीएमएल बसवर कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाले होते.दरम्यान शुक्रवारी राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या आत्महत्येस पीएमपीएल मधील वरिष्ठांना जबाबदार धरत कटुंबियांनी तक्रार केली आहे. यामध्ये कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठांनी मानसिक छळ केल्यामुळे विलास बुलेंनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांना दरमहा योग्य पगार मिळत नव्हता. तसेच कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठांकडून मानसिक छळ होत होता, असा आरोप तक्रारीत केला आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!