(kalyan) कल्याण : पत्रकाराला डान्सबारचा नाद लागला. आणि डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी भरदिवसा कल्याण परिसरात बंद घरे हेरुन घरफोड्या करू लागला. तो एकटाच चोरी करत असल्याने पोलिसांची देखील त्याचा शोध घेता-घेता महिनाभर दमछाक झाली होती. अखेर खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करून या चोरट्याला अटक केली आहे.
रोशन जाधव (निळजे, डोंबिवली, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. तर तब्बल ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन, दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार…!
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने परिसरात एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने दिवसा घरफोडी करुन सुमारे ३५ तोळे सोन्याचे चोरी केली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला होता. तसेच, गेल्या महिनाभरात दिवसा घरफोडी करण्याच्या घटना परिसरात सतत घडत होत्या, त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते.
पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक कौशल्याच्या आधारे ८ एप्रिल रोजी शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून एका संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यात मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर परिसरात दिवसा घरफोडी करुन गुन्हे केल्याचे सांगितले.
दरम्यान, रोशन जाधव याने मास मीडिया कम्युनिकेशनचं शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एका मोठ्या वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र, याच दरम्यान त्याला डान्स बारचं व्यसन लागलं. डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला. हा आरोपी दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन. तो वॉचमन नसलेल्या इमारतीत दिवसा एकटा घुसून घरफोडी करत असे. असे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले आहे.