Junnar Crime | जुन्नर, (पुणे) : राजुरी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने दोन शेळ्या मारून टाकल्याची घटना घडली आहे. तसेच तिसऱ्या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना नागरिकाने केलेल्या आवाजाने बिबट्याने तेथून धूम ठोकल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील आबाटेक मळ्यात राहत असलेले मनेश दगडू कणसे यांचा शेळी व कोंबड्या पालनाचा व्यवसाय आहे. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला असता ते त्या ठिकाणी गेले बिबट्याने दोन शेळ्या मारून टाकल्या होत्या व तिसऱ्या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्यांनी मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने पळ काढला.
या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, गोठ्याच्या बाजूलाच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातून पंधरा कोंबड्यादेखील बिबट्याने फस्त केल्या आहेत. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी संतोष साळुंखे, त्रिबंक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, राजुरी येथे दोनच दिवसांपूर्वी जावेद पटेल या शेतकऱ्याचा बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असून, या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.