पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने सायबर चोरट्याने थेट पोलीस अंमलदारालाच पैसे मागून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकारणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार कृष्णा विजय गवळी यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या व्हाट्सअॅप प्रोफाइलवर आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो लावला. आणि १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११च्या दरम्यान पोलीस अंमलदार कृष्णा गवळी यांना 917358921046 या नंबरवरून व्हाट्सअॅपवर मेसेज केला. आणि आपण पोलीस आयुक्त असल्याचे भासवले. त्यानंतर गिफ्ट कार्ड देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ४१९, ५११, १७० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या ऑनलाइन फसवणुकीपासून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.