राहुलकुमार अवचट
यवत – मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे आठ दिवसापूर्वी एकाच रात्रीत १३ घरफोड्या करणारी टोळी, पुन्हा दरोडयाच्या तयारीत असताना यवत पोलिसांनी केडगाव चौफुला (ता.दौंड) येथून मंगळवारी (ता.६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनिल मारूती लोणी (वय-२२) सौरभ दत्तात्रय शिंदे (वय २४, दोघेही रा. चिंचवड बालाजीनगर ता. हवेली), राहुल राधाकिसन आगम (वय-२१ रा दिद्यी आळंदी खेड), अभिषेक सुनील चौधरी (वय-२२) राहुल रमेश चव्हाण (दोन्ही रा. केडगाव ता.दौंड), विकास नारायण सानप (वय-१९,रा फरंडेनगर दिद्यी ता खेड) अशी अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींची नावे आहे. तर एकजण फरार झाला आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथे आठ दिवसापूर्वी एकाच रात्रीत १३ घरफोड्या करणारी टोळी, केडगाव चौफुला येथे दरोड्याच्या तयारीत आहे. अशी माहिती पोलीस नाईक सोनवणे व कापरे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. सोनवणे व कापरे यांनी तत्काळ हि माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले.
पोलिसांचे पथक तत्काळ केडगाव चौफुला येथे दाखल झाले. पोलिसांना तेथे ७ जण संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता, ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून ६ जणांना अटक केली आहे. तर १ जन फरार झाला आहे. त्यांच्याकडून हिरो कंपनीची स्पेल्डंर प्लस, ऍक्टिव्हा व ४ मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ऍक्टिव्हा गाडीच्या डिकीमध्ये कोयता, लोखंडी काटावणी,पक्कड, मिरची पावडर पुड, बॅट आढळून आली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींन मांडवगण फाराटा येथील १३ घरफोडया केल्याची कबुली दिली आहे. तरी, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.
हि कारवाई यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक सोनवणे ,पोलीस नाईक कापरे पो.कॉ.भापकर पो.कॉ.गडदे,पोलीस मित्र राजेद्र अडागळे आणि रामा पवार यांनी केलेली आहे.