पुणे : रहिवासी इमारतीच्या प्रवेशद्वाराभोवती पत्रे लावून अतिक्रमण केले. या विरोधात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार करणाऱ्या पुण्यातील एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराला आणि त्यांच्या आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता.१६ ) दुपारी बाराच्या सुमारास मुंढवा येथील प्रियांका रेसिडेन्सी बिल्डींग समोर घडला आहे याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे .
सुरेंद्र पिल्ले (वय-६५ ), विशाल सुरेंद्र पिल्ले (वय-४० ) आशिष पिल्ले (वय-३५) रा. गणेश नगर, वठारे वस्ती, मुंढवा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर, विशाल पिल्ले याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकणी अमित तानाजी रुके (वय-२७ रा. शिर्के कंपनी रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकार (फोटोग्राफर) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या तळमजल्याला व्यावसायिक गाळे असून काही व्यावसायिकांनी या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारुन अतिक्रमण केले आहे. आरोपींनी अतिक्रमण करुन गाळ्यामध्ये बिअर श़ॉप व हार्डवेअरचे दुकान सुरु केले आहे. यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची वाहने पार्किंग मध्ये लावताना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपार्टमेंट मधील फिर्यादी आणि इतर रहिवाशांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली होती.
दरम्यान, तक्रारनुसार शुक्रवारी (ता.१६ ) दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण हटवले होते. अतिक्रमण कारवाई सुरु असताना आरोपींनी फिर्यादी आमित यांच्या वडिलांना मारहाण केली. त्यावेळी फिर्य़ादी अमित आणि त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आशिष पिल्ले याने लोखंडी हत्याराने डोक्यात पाठीमागील बाजूस वार केला. तर विशाल याने फिर्यादी आमित यांचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.
याप्रकरणी अमितने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.