हडपसर, (पुणे) : भारत शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्राद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड प्राप्त करून विनापरवाना विनापासपोर्ट पुण्यात राहणाऱ्या ३ अल्पवयीन मुले, तीन महिलांसह ८ जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेएसपीएम कॉलेजच्या पाठीमागे उरुळी देवाची (ता. हवेली) येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निजाम रहीम अली शेख राठी, (वय- ३०), बाबू मोसिन मंडल राठी, (वय-३०), कमरोल रोशन मंडल राठी, (वय- २२) सागर आलम शेख राठी वय – २२) नजमा बाबू मंडळ राठी वय – २५) मरियम कमरू मंडल राठी, (वय-३५) आलम शेख राठी, (वय -२४) शाहिनूर आलम शेख राठी (वय- २५) आदर्श नगर सर्व देवाची उरुळी पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) अडीच वाजण्याच्या सुमारास निजाम शेख, बाबू मोसिन मंडल, कमरूल रोशन मंडल, सागर आलम शेख हे बांगलादेशाचे परकीय नागरिक असून त्यांनी भारत शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्राद्वारे भारतातील आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड प्राप्त करून विनापरवाना विनापासपोर्ट भारतामध्ये वास्तव्य करताना मिळून आले.
दरम्यान, त्यांच्याकडे विनापासपोर्ट व विनापरवाना भारतामध्ये राहत असल्याने त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे करीत आहेत.