पुणे : स्वारगेट येथील दुकानांमध्ये गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी (ता.२६) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत भंगार, गादी घर आणि रद्दी डेपोचे दुकान जाळून खाक झाले आहे. या आगीवर अग्निशामक दलाने लवकर नियंत्रण मिळविल्याने कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून ही आग दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास लागली. अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करीत ही आग विझवण्यात आली. बघता बघता या आगीने मोठे रूप धारण केले. शेजारी असणाऱ्या भंगार दुकान आणि रद्दी डेपोमध्ये ही आग पसरली आणि तीन दुकाने आगीत जाळून खाक झाली.
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या अग्नीशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.