वर्धा : शासकीय मदत लवकर मिळणार नाही, म्हणून मनोधैर्य खचलेल्या विदर्भातील एका शेतकऱ्याने विजेची तार तोंडात धरून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अन सरकार, काय ते थर, काय ते गोविंदा, काय ते सेलिब्रिटी, काय त्या नर्तकी आणि काय ते नेते ! काय त्या घोषणा !व्वा, एकदम वो क्के म्हणण्यात दंग झाले आहे.
गणेश श्रावण माडेकर (वय-३६, रा. पढे, जि. वर्धा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश माडेकर हे एक शेतकरी आहेत. अतिवृष्टीमुळे त्यांच्या साडेसहा एकर क्षेत्रामधील तूर, कपाशी व सोयाबीनचे पीक नदीला आलेल्या पुरामुळे जमीन खरवडून गेल्याने नष्ट झाले होते, शासकीय मदत लवकर मिळणार नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील आहेत.
त्यांच्या आत्महत्येमुळे पढे गावावर शोककळा पसरली असून,दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विदर्भात यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झाले आहे, सुरवातीला उपमुख्यमंत्री फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, त्यांनतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार ,विरोधी पक्षनेते यांनी पाहणीचा फार्स करून झाला आहे. शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु, सरकार आणि प्रशासन यांची एकूण कार्यपद्धती, धोरणे,निकष,यांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
विदर्भात अतिवृष्टीने ओला दुष्काळच पडला आहे, असे असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणं गरजेचं असताना पाहणी दौऱ्याचे फार्स केले जातात. तुटपुंज्या नुकसानभरपाई च्या निव्वळ घोषणा केल्या जातात. दुसरीकडे मंत्री,आमदार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दहीहंडीच्या उत्सवात नाचण्यात,आणि झुलण्यात धन्यता मानताना दिसतात, काय ते थर, काय ते गोविंदा, काय ते सेलिब्रिटी, काय त्या नर्तकी आणि काय ते नेते ! काय त्या घोषणा !व्वा एकदम वो क्के मधी सगळे !
दरम्यान, सरकार,आणि मंत्री सर्वसामान्य माणसांच्या,शेतकऱ्यांच्या संकटात आधार देण्यासाठी आहेत की सवंग लोकप्रियता मिळवून देणाऱ्या सण, मिरवणुका, आणि उत्सवात नाचण्यासाठी ?असा संतापजनक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.