जनार्दन दांडगे.
पुणे Fake Journalist Case- खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे ५ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापुर मधील “एम एच 13 न्युज” या वृत्तवाहिनीच्या खंडणीखोर पत्रकार बंधुना न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Fake Journalist Case)
महेश सौदागर हनमे (वय-४७) आणि दिनेश सौदागर हनमे (वय-४४, दोघे रा. राजेश्वरी नगर, ब्लॉक नं. ११२, बाळे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) ही त्या खंडणीखोर पत्रकारांची नावे असुन, ते सोलापुरमधील “एम13न्युज”या वृत्तवाहिनीचा मालक व चालक म्हणुन वावर आहेत. दरम्यान हनमे बंधुनी पुण्यातील उद्योजकाबरोबरच सोलापूरमधील बिल्डरकडे ५० लाख अन् २ फ्लॅटची खंडणी मागितल्याचे पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-2 ने केलेल्या प्राथमिक तपासात निस्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे आदी वरील तोतया पत्रकारांच्या मागावर असतांना, काल (गुरुवारी) सायंकाळी हनमे बंधुंनी पाटस टोलनाक्यावर पोलिसांच्या अंगावार चारचाकी घालून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी प्रसंगावधान राखून बचावासाठी त्यांच्या गाडीच्या मागील टायरच्या दिशेने गोळीबार देखील केला होता. त्यांना पाठलाग करून पाटस टोलनाक्यावरून अटक करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी हनमे बंधुंच्याकडे चौकशीत, सोलापूरमधील बिल्डरकडे ५० लाख अन् २ फ्लॅटची खंडणी मागितल्याचे निस्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबधित बांधकाम व्यावसायिकांने पोलिसांना संपर्क साधुन वरील माहिती दिली आहे.
बनावट व खंडणीखोर पत्रकारांचा सुळसुळाट…
पुणे शहर व परीसरात मागील वर्षभराच्या काळात सहाहुन अधिक कथीत पत्रकारांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. लोणी काळभोर मधील एक पत्रकार मागील पंधरा दिवसापासुन जेलची हवा खात आहे. तर सोलापुरच्या हनमे बंधुनी तर कहरच करुन टाकला आहे. मागील कांही महिण्यापासुन पुणे शहर व परीसरात विषेशतः पुर्व हवेलीत बोगस पत्रकारांचे पेव फुटले आहे. आम्ही पत्रकार आहोत हे पहा आमचे प्रेस कार्ड असे म्हणत अनेक कथित बोगस पत्रकार व्यावसायिक आणि नागरिकांची लूट करत आहेत.
ना डिग्री, ना अभ्यास, ना चार ओळी लिहिण्याची अक्कल, ना कुठले अधिकृत चॅनेल किंवा पेपर मात्र तरीही काही महाभाग प्रेस चे बोगस आयडी कार्ड तयार करून त्याचा वापर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसाठी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने आता अश्या मान्यता न घेता बोगस चॅनेल आणि पोर्टल चालवून प्रेस आयकार्ड वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पत्रकारांचे अधिकृत/अनधिकृत धोरण आखून बोगस चॅनेल्स चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खंडणी मागितल्यास थेट गुन्हे शाखेकडे संपर्क साधा- पोलिसांचे आवाहन..
दरम्यान, पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत कोणी खंडणीची मागणी करत असेल, मग तो पत्रकार असो इतर कोणी खंडणीखोर, नागरीकांनी थेट गुन्हे शाखेकडे अथवा पोलिस आयुक्तालयात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रार करणाऱ्या नागरीकांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ठ केले आहे. तसेच महेश हनमे व दिनेश हनमे या दोघांनी आनखी कोणाला खंडणी मागितली असल्यास, संबधितांनी थेट पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक (2) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.